⁉ वाढते प्रदूषण व ई-कचऱ्यामुळे होणारी डोकेदुखी - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Sunday, November 24, 2019

⁉ वाढते प्रदूषण व ई-कचऱ्यामुळे होणारी डोकेदुखी👉 स्मार्ट फोन दुरुस्ती व सॉफ्टवेअर अपग्रेड करणे सोपे असणारे मोबाइल हॅंडसेट बाजारात आणण्याची गरज भासत आहे. यासाठी, युरोप व अमेरिकेत काही कंपन्यांनी किमान 5 वर्षं टिकतील असे फोन बाजारात आणले आहेत. फोनमधील पार्टस (सीपीयू, प्रोसेसर व इतर चिप) वेल्डिंग किंवा सोल्डर करण्याऐवजी खाचेत बसवले जातात. अशाने ग्राहकांना स्वतःचा फोन दुरुस्त करणे स्वस्त व सोयीचे पडते.

📱दरवर्षी नवीन फोन खरेदीची सवय
काही कंपन्या दरवर्षी फोनचे एक नवीन मॉडेल लॉन्च करतात व ग्राहकांना आधुनिक फीचर्ससाठी जुना फोन सोडून नवीन मॉडेल घेण्यासाठी उद्युक्‍त करतात. स्मार्टफोन तज्ज्ञांना नवीन फोनबाबत सकारात्मक रिव्हिव देण्यासाठी पैसे देखील हे ब्रॅण्ड्‌स पुरवतात. जुन्या मॉडेल्सच्या बॅटऱ्या बनविणे थांबवतात, त्याला मिळणारे सॉफ्टवेअर अपडेट बंद करतात. कधीकधी तर स्मार्टफोन निर्माते स्वतःच्या सर्व्हिस सेंटरमार्फत विकले जाणारे जुन्या मॉडेल्सचे भाग दुप्पट-तिप्पट किमतीने विकू लागतात. शेवटी नाईलाजास्तव ग्राहक नवीन फोन घेऊन मोकळा होतो. हास्यास्पद बाब म्हणजे ज्या देशात बहुतांश फोन नेटवर्क 3-जी सेवा देतात तेथे देखील या कंपन्या 5-जी फोन ग्राहकाला विकतात. अशा वस्तूंचा पुढील 2 वर्ष पुरेपूर फायदा घेता येणार नाही हे जाणून देखील लाखो रुपये खर्च करून लोक असे फोन विकत घेतात. जुना फोन कपाटात राहतो किंवा विकला जातो. तो आउटडेटेड झाला असल्यास बॅटरी काढून स्क्रीन तोडून भंगारात विकला जातो.


👾 पर्यावरण व आरोग्यावर भयानक परिणाम 
2017 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या संशोधकांनी ई-कचऱ्याच्या समस्येवर अभ्यास करून एक अहवाल सादर केला. त्यात जगभरातील इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांच्या ई-कचऱ्यात आउटडेटेड मोबाइल फोन, लॅपटॉपच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याचे सांगितले गेले. जगभरातील ई-कचरा केनिया, चीन, डोमिनिकन रिपब्लिक, थायलंड, तैवान आणि ग्रामीण हॉंगकॉंगमध्ये रिसायकलिंगच्या नावाखाली विकण्यात येतो. ई-कचरा अयोग्य पद्धतीने हाताळला जातो. यामुळे प्रदूषणाबरोबरच हा कचरा हाताळणाऱ्या लोकांच्या आरोग्यावरही त्याचा मोठा परिणाम होतो असे संयुक्त राष्ट्रांच्या अभ्यासात दिसून आले आहे.

🚯 भारतातील परिस्थिती फारशी वेगळी नाही.
देशात किमान 650 दशलक्ष लोक मोबाइल हॅंडसेट वापरतात. फोनमॉडेल अपग्रेड करण्याच्या हट्टामुळे यातील 40 टक्के लोक त्यांचा स्मार्टफोन 12 महिन्यांहून कमी काळ वापरतात. टॉक्‍सिक्‍स लिंक नावाच्या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात जमा होणाऱ्या ई-कचऱ्यात घरगुती इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंबरोबरच जुने मोबाइल फोन मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहेत. फोन तसेच इतर इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंमधील सर्किट बोर्डमध्ये असलेले सोने व मौल्यवान धातू वेगळे करण्यासाठी सर्किट बोर्ड विषारी ऍसिडमध्ये बुडवले जातात. उरलेले भाग सरळ जाळून टाकण्यात येतात. प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या वायूमुळे असा कचरा हाताळणाऱ्या कामगारांना कर्करोग, श्‍वसनाचा आजार तसेच इतर रोग होऊन त्यांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होत आहे.

📳 ई-कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याच्या सकारात्मक दिशेने केंद्र सरकारने ई-कचरा व्यवस्थापन नियम 2016 लागू केला. यानुसार, इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मात्यांना त्यांच्या उत्पादनांमुळे तयार होणारा ई-कचरा जमवून त्याची योग्य ती विल्हेवाटही लावणे (रिसायकलिंग) बंधनकारक करण्यात आले आहे. तथापि, कंपन्या नवीन कायद्याचे पालन करीत आहेत याची खात्री करण्यासाठी सध्या सरकारकडे कोणतीही तपासणी यंत्रणा जागेवर नाही. सध्या भारतात अधिकृतरित्या अतिशय व्यावसायिक पद्धतीने ई-कचरा जमवून रिसायकलिंग करणाऱ्या एजन्सींची संख्या कमी असल्याने 95 टक्के कचरा असंघटित क्षेत्राद्वारे चुकीच्या पद्धतीने हाताळला जातो.

👉 सहज कोणतातरी कार्यक्रम करायचा म्हणून एकदिवस ई-कचरा गोळा करण्यासाठी उभारण्यात येणारे राजकारणी मंडळींचे स्टॉल सोडले तर देशातील मोठ्या महानगरपालिकांकडे ई-कचऱ्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. भारतात पुनर्वापरयोग्य किंवा रिसायकल करता येणाऱ्या वस्तू देखील कचऱ्यात फेकल्याने त्या लॅंडफिलमध्ये व कचऱ्याच्या ढीगाऱ्यात पोचतात. सध्या पर्यावरणशास्त्रज्ञ स्मार्ट फोन बनवणाऱ्या कंपन्यांना जुने मोबाइल हॅंडसेट रिसायकल करण्यावर जोर देण्याचा सल्ला देत आहेत. दुर्दैवाने, जगात सध्या केवळ 10 टक्के आउटडेटेड मोबाइल हॅंडसेट रिसायकल केले जातात.

📳 स्मार्टफोन दुरुस्ती करणाऱ्या मोबाइलची गरज
दर वर्षी हॅंडसेटला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण वाढत असल्याने खनिजांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन होतेच व त्याबरोबर फोनच्या उत्पादनादरम्यान बरीच ऊर्जा देखील खर्च केली जाते. स्मार्टफोन मॅन्युफॅक्‍चरिंगमुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी नवीन फोन मॉडेल घेण्याऐवजी जुन्या फोनमध्ये सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअर अपग्रेड करणे सोपे झाले पाहिजे. फोन कंपन्यांनी एक्‍सचेंज ऑफर देखील चालवणे गरजेचे झाले आहे. दुरुस्तीसाठी फोनच्या विविध भागांची अदलाबदल करणे सोपे झाल्यास वस्तूचे आयुषमान वाढेल. दुरुस्तीसाठी लागणारे सुटे भाग आणि सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध असल्यास ग्राहकांना स्वतःचा फोन दुरुस्त करणे स्वस्त व सोयीचे पडेल.

📱युरोप व अमेरिकेत काही कंपन्यांनी किमान 5 वर्षं टिकतील असे फोन बाजारात आणले आहेत. या मोबाइल हॅंडसेटचे सॉफ्टवेअर, पार्टस, बॅटरी, तसेच इतर हार्डवेअरमध्ये बदल करणे सोपे आहे. या फोनमधील पार्टस (सीपीयू, प्रोसेसर व इतर चिप) वेल्डिंग किंवा सोल्डर करण्याऐवजी खाचेत बसवले जातात. यामुळे समस्या निवारणासाठी सर्व्हिस सेंटरला जाण्याची ग्राहकाला गरज भासत नाही. सर्व बदल ग्राहक स्वतःच करू शकतो.

🤳वाढत्या किमती व 5 - जी नसल्याने ग्राहकांची पाठ सुदैवाने, विकसित देशातील स्मार्टफोन यूजर्समधील फोन अपग्रेड करण्याची उत्सुकता कमी होताना दिसत आहे. स्पेन स्थित संशोधन संस्था “कंतार’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार हुवावे, सॅमसंग आणि ऍपल कंपन्यांचे भ्रमणध्वनी वापरणारे लोक 2016 पर्यंत विकत घेतलेला फोन साधारण 2 वर्षांच्या आतच वापरणे सोडून नवीन मॉडेल घ्यायचे. परंतु, 2016 पासून 2018 दरम्यान या आकडेवारीत फरक पडला. सध्या स्पेन, इटली, ग्रेट ब्रिटन, जर्मनी आणि अमेरिकेसारख्या विकसित देशात लोक फोन श्रेणीसुधारित करण्यात उत्सुकता दाखवेनासे झालेत. फोनच्या किमतींमध्ये झालेली साधारण 52 टक्के वाढ, तसेच 5-जी नेटवर्क कव्हरेजचा अभाव, या दोन कारणांमुळे लोकांना आहेत तेच फोन वापरणे योग्य वाटत असल्याचे कंतारच्या अहवालात म्हटले गेले आहे.
या अहवालात धक्‍कादायक असे काहीच नाही कारण ऍपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी देखील यावर्षी जानेवारी महिन्यात गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात आयफोनचे जुने मॉडेल वापरणाऱ्यांनी आयफोन 11 विकत घेण्यात उत्सुकता दाखवली नसल्याचे कबूल केले होते. या बाबत लोकांमध्ये जागरूकता होण्यास सुरूवात झाली असली तरी देखील जगभरात अनावश्‍यक फोन खरेदी कमी करण्याच्या दिशेने अजून बरीच पावले उचलणे गरजेचे आहे.

🔴 स्मार्टफोनमध्ये वापरले जाणारे घटक (पार्ट)
स्मार्टफोन खरेदी करताना त्याचा ब्रॅंड, डिझाइन, डिस्प्ले, सिक्‍यॉरिटी फिचर्स, प्रोसेसर, कॅमेराची तसेच बॅटरीची क्षमता, फोनचा रॅम व इतर फीचर विचारात घेतले जातात. परंतु फोनचा जीव असतो त्यातील एस.ओ.सी (सिस्टिम ऑन चिप) सर्किटबोर्ड मध्ये. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयू) चिप, रॅम, ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट (जीपीयू) चिप, डिस्प्ले प्रोसेसर, मॉडेम चिप, व्हिडिओ प्रोसेसर, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग (डीएसपी) चिप आणि कॅमेरा युनिट देखील एस.ओ.सी. सर्किट बोर्डला सोल्डर केलेले असतात. या व्यतिरिक्‍त, चार्जिंग पोर्ट, हेडफोन जॅक, स्पीकर्स, जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) चिप, व्हायब्रेटर मोटर, व इतर आवश्‍यक घटक एसओसी सर्किटबोर्डला एकतर सोल्डर केले जातात, किंवा नाजूक तारांच्या साहाय्याने जोडलेली असतात. थोडक्‍यात सांगायचे तर, स्मार्टफोनमधील असलेल्या साधारण 1,631 लहान मोठ्या घटकांपैकी सर्वच सिस्टिम ऑन चिप सर्किटबोर्डला जोडलेले असतात.

🔴 खनिजांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन 
सप्टेंबर 2018 दरम्यान ब्रिटनच्या “द इकॉनॉमिस्टन’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार स्मार्टफोनच्या वेगवेगळ्या पार्टससाठी वापरल्या जाणाऱ्या 75 खनिजांमध्ये कोबाल्ट, टंगस्टन, कथिल, टॅंटॅलम, सिलिकॉन, सोने, इंडियम आणि लिथियमचा समावेश आहे. यांचा वापर चिप्स, कॅपॅसिटर्स, स्पीकर, व्हायब्रेटर मोटर आणि फोनची स्क्रीन बनविताना केला जातो. बऱ्याच कंपन्या त्यांच्या फोनमध्ये वापरले जाणारे बहुतांशी घटक दहशदवाद्यांच्या नियंत्रणात असलेल्या देशातून आयात करणे टाळतात. तरीदेखील मानवी हक्क धाब्यावर बसवणाऱ्या कॉंगो सारख्या देशातून खनिजांचा पुरवठा अनेक कंपन्यांना केला जातो हे सत्य कोणी फेटाळू शकत नाही. अशा देशात लहान मुलांकडून देखील गुलामांसारखे उत्खननाचे काम करून घेतले जाते.

Post Bottom Ad

#

Pages