रस्ता अपघाताचे प्रमुख कारणे.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, February 20, 2020

रस्ता अपघाताचे प्रमुख कारणे..

रस्ता अपघाताचे प्रमुख कारणे..
तरुणपणी अपघातामुळे कुटुंबाचे सगळ्यात जास्त नुकसान होते. कुटुंबियांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. यावर उपाय, नियम कितीही करा, जोपर्यंत वाहनचालकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत अपघातांची मालिका थांबणार नाही.
महाराष्ट्र राज्यात अपघातांची संख्या प्रति वर्ष पाच लाखांपेक्षा जास्त आहे. भारत 18 टक्‍के, सर्वाधिक प्रमाण आफ्रिकेत (24.1) आणि कमी प्रमाण युरोपमध्ये (10.3) आहे. तर महाराष्ट्र राज्यात जानेवारी ते डिसेंबर 2019 या एका वर्षाच्या कालावधीत 32 हजार 876 रस्ते अपघात झाले. त्यामध्ये 12 हजार 565 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र राज्यात 18 राष्ट्रीय, 291 राज्य असे सुमारे 33 हजार 700 किलोमीटरचे महामार्ग आहेत. सर्वाधिक अपघात याच मार्गांवर होतात. ग्रामीण भागातील रस्ते लहान, खड्डेमय, वाकडेतिकडे असतात. पण त्यामानाने गावाकडे अपघाताचे प्रमाण कमी आहे आणि जरी अपघात झाले तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी आहे.
रस्ता अपघाताची कारणे प्रामुख्याने मानवी, नैसर्गिक असतात..
अ) मानवी कारणे
1. अतिवेगाची नशा.
2. धोकादायक ओव्हरटेकिंग/लेन कटिंग.
3. मद्यपान करून गाडी चालविणे.
4. गाडीत अनेक प्रवासी कोंबणे वा क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहून नेणे.
5. गाडी चालविण्याचे नीट प्रशिक्षण न घेणे वा वाहतूक नियमांचे अपुरे ज्ञान.
6. चालकांवरील अतिताण, थकवा.
7. कुठेही गाडी उभी करणे.
8. हेल्मेट, सीट बेल्ट न वापरणे,
9. पादचाऱ्यांची चूक.
10. वाहतुकीची कोंडी.
ब) नैसर्गिक कारणे
1. धुके किंवा मुसळधार पाऊस,
2. प्रचंड उष्णता निर्माण झाल्याने टायर फुटणे.
3. जनावर रस्त्यात आडवे येणे. 4. दरड कोसळणे.
यातील एक दोन नव्हे तर सगळीच मानवी कारणे थोडा बारकाईने विचार केल्यास त्यावर उपाययोजना सहज शक्‍य आहे. थोडा संयम आणि वाहनाचा वेग कमी असल्यास नैसर्गिक कारणांवरही आपण विजय मिळवू शकतो. अपघाताचे प्रमाण कमी का होत नाही. त्यात “काय करावे’ व “काय करू नका’ याची मोठी लिस्ट असते, तरी अपघात कमी होत नाहीत. नियम आणि गाडी चालवताना काय खबरदारी घ्यावी हे सगळे अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. तरी अपघात कमी झाले नाही. किंबहूना महामार्गावर झालेल्या एकूण अपघातांपैकी 75 टक्‍के अपघात हे मानवी चुकीमुळेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याचा अर्थ कितीही नियम बनवले. काय करावे, काय करू नका याचे कितीही पाढे वाचले तरी अपघात कमी होणार नाहीत हे सिद्ध झाले आहे. कारण एका चालकाने कितीही नियम पाळले पण समोरच्या चालकाने नियम पाळले नाहीत तर काहीच उपयोग होणार नाही. नियमांचे पालन करायचे नाही अशी मानसिकता असेल तर मग नियमांचा काय उपयोग. मग अपघात कमी करण्यासाठी काय करावे लागेल. त्यासाठी पहिल्यांदा अपघात होण्याचे महत्त्वाच्या गोष्टींवर काम करावे लागेल.
1) चालकांची मानसिकता - अपघाताचे प्रमुख कारण सगळ्यांना असलेली घाई त्यामुळे वाहनाचा वेग आपोआप वाढतो. दुसरे कारण आहे चालकाची मानसिकता ठीक नसेल तर त्यामुळेही अनेक अपघात झाल्याचे आकडे आहेत. स्वतः चालकानेच आपली मानसिकता पाहून आज ड्रायव्हिंग करायची की नाही याचा निर्णय घ्यायला पाहिजे.
2) जागरूक प्रवासी - प्रवाशाने जागरूक राहणे गरजेचे आहे. आपण ज्या सार्वजनिक वाहनांनी प्रवास करत आहोत. त्या वाहनाचा चालक त्याचे वाहन चालवण्याचे प्रशस्तीपत्रक तपासणे, तो मद्य प्यायला आहे का, तो वाहतुकीचे नियम पाळतो का, त्याच्या वाहनाचा वेग योग्य आहे का, अशा गोष्टी प्रवासी पाहू शकतात.
3) भ्रष्टाचारमुक्‍त वाहतूक विभाग - वाहतुकीचा कुठलाही नियम मोडा 100-200 रुपये दिले की वाहतूक पोलीस आम्हाला सोडतात ही चालकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत नियम मोडले जाणार. केवळ वाहतुकीचे नियम कडक करून उपयोग नाही. त्याची पारदर्शकपणे अंमलबजावणी व्हायला पाहिजे.
4) सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था - सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे वाजलेले तीनतेरा, वेळ न पाळण्यात एसटी महामंडळ कुप्रसिद्ध आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जर वेळेच्या बाबतीमध्ये काटेकोर, आरामदायी, स्वच्छ झाली तर बहुतेकजण खर्चिक खासगी वाहने वापरण्याऐवजी परवडणारी सार्वजनिक व्यवस्थाच वापरतील त्यामुळे अपघातच नाही, तर प्रदूषणापासून अनेक फायदे होतील.
युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड पॅसिफिकच्या अभ्यासानुसार, रस्त्यावरील अपघातांमुळे भारताचे दरवर्षी 58 अब्ज डॉलर म्हणजे देशाच्या जीडीपीच्या 3 टक्‍के एवढे नुकसान होते. विमा भरपाई, वाहनांचे नुकसान, अपघातांमुळे रुग्णालयांवर पडणारा ताण व वैद्यकीय सेवेवरील खर्च, वाहतूक कोंडी, वाढते प्रदूषण, प्रवास कालावधीत वाढ हेही दुष्परिणाम आहेत. अपघातग्रस्त कुटुंबाला भोगाव्या लागणाऱ्या आर्थिक व मानसिक यातना आणि दुःख याची किंमत करणे कठीण आहे. या सगळ्या यातनांमधून मानव मुक्‍त होऊ शकतो. गरज आहे वाहन चालवताना उघड्या डोळ्यांसोबतच उघड्या मनाची.

Post Bottom Ad

#

Pages