🚂 हडपसर रेल्वे टर्मिनल जूनपर्यंत कार्यान्वित; पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, February 22, 2020

🚂 हडपसर रेल्वे टर्मिनल जूनपर्यंत कार्यान्वित; पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी..

🚂 हडपसर रेल्वे टर्मिनल जूनपर्यंत कार्यान्वित; पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी..

पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने हडपसर येथे उभारण्यात येत असलेल्या रेल्वे टर्मिनलसाठी पायाभूत यंत्रणांचा विस्तार आणि प्रवासी सुविधांची कामे सध्या वेगाने सुरू आहेत. पुणे शहरातील हे दुसरे रेल्वे टर्मिनल ठरणार आहे. येत्या जून महिन्यापासून ते कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानकाची सद्य:स्थिती लक्षात घेता या स्थानकातून दररोज अडीचशेहून अधिक गाडय़ांची ये-जा असते. पुणे-लोणावळा आणि पुणे-दौंड, बारामती आदी उपनगरीय गाडय़ांचीही स्थानकावर रेलचेल असते. त्यामुळे स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. गाडय़ांच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास पुणे स्थानकाची क्षमता संपली आहे. अनेकदा स्थानकावर गाडय़ा उभ्या करण्यासाठी फलाटही उपलब्ध होत नाहीत. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे सेवा-सुविधांवरही ताण निर्माण होतो आहे. हा भार कमी करण्याच्या दृष्टीने हडपसर टर्मिनलचा वापर करण्यात येणार आहे.

हडपसर स्थानकात सध्या पायाभूत सुविधांबाबत वेगाने कामे सुरू आहेत. मुख्य दोन फलाटांमध्ये चार मार्गिका टाकण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे गाडय़ा मुक्कामी ठेवण्याच्या दृष्टीनेही एक मार्गिका आणि फलाटाचे काम करण्यात येत आहे.

नव्या इमारतीचे काम सध्या पूर्ण करण्यात आले असून, फलाटावरील छताचे काम अंतिम टप्प्यात आहे. २६ डब्यांची गाडी बसेल अशा लांबीचे फलाट स्थानकात उभारण्यात आले आहेत. पुढील काळात सेवा-सुविधांबरोबरच स्थानकाचा आणखी विस्तार होऊ शकणार आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनीही नुकतीच स्थानकाच्या कामाची पाहणी केली. टर्मिनल म्हणून हडपसर स्थानक जूनपर्यंत कार्यान्वित होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दक्षिणेकडील गाडय़ा हडपसरहून..
पुणे स्थानकापासून सर्वात जवळ असलेल्या हडपसर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणे स्थानकावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येणार आहे. टर्मिनल म्हणून या स्थानकात गाडय़ा मुक्कामी ठेवता येतील. त्याचप्रमाणे गाडय़ांची स्वच्छता आणि देखभालीची व्यवस्थाही तेथे होऊ शकते. जूनमध्ये टर्मिनल कार्यान्वित झाल्यास सुरुवातीला दक्षिणेच्या दिशेने जाणाऱ्या काही गाडय़ा हडपसरहून सोडण्याबाबत रेल्वेचा विचार आहे.

कामाला अडथळ्याची मालिका..
पुण्यासाठी पर्यायी टर्मिनल म्हणून हडपसर स्थानकाची निवड झाल्यानंतर २०१६ मध्ये त्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर तातडीने कामे होणे अपेक्षित असताना सुरुवातीच्या कालावधीत निधी न मिळाल्याने कामे रखडली. त्यानंतर अपुऱ्या निधीमुळे कामांचा वेग मंदावला. अशाच स्थितीत जागेच्या मुद्दय़ावर काही स्थानिक मंडळी न्यायालयात गेली. त्यामुळेही कामाच्या वेगावर परिणाम झाला. मात्र, सध्या निधीही मिळाला असून, जागेचा प्रश्नही निकाली निघाला आहे.

Post Bottom Ad

#

Pages