🚷 पुण्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मा.पोलीस सहाय्यक आयुक्त श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिले जमावबंदीचे आदेश.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Monday, March 23, 2020

🚷 पुण्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मा.पोलीस सहाय्यक आयुक्त श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिले जमावबंदीचे आदेश..


🚷 पुण्यात कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर मा.पोलीस सहाय्यक आयुक्त श्री.डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिले जमावबंदीचे आदेश..

फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ कलम १४४ (१) (३) प्रमाणे जमावबंदीचे आदेश..

१) जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषित केला आहे. कोरोना विषाणुचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, पुणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसुन येत आहे. तसेच राज्यशासनाने कोरोना विषाणु (कोविड-१९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड २, ३ व ४ मधील तरतुदींनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याबाबतची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. त्याशिवाय केंद्र व राज्य सरकार यांच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेप्रमाणे कोरोनाग्रस्त रुग्णांचे संपर्कात लोकांनी येवु नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन केल्यास या विषाणुचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक आहे. त्याकरिता तात्काळ प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. अशी उपाययोजना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ खालील तरतुदींच्या अनुषंगाने जनतेस, व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून आदेश काढले आहेत.

२) महाराष्ट्र शासन, राजपत्र असाधारण भाग-१ मध्य उप-विभाग यांचे कडील अधिसुचना क्रमांक ३ मधील पान क्र. ४ मधील फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चा क्र. एमएससी-१२७४/व्ही-एफ मधील आदेशाने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ (II -1974) चे कलम २१ अन्वये विशेष पोलीस महानिरीक्षक यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणुन नियुक्त करुन कलम १४४ चे विशेष अधिकार प्रदान केलेले आहेत.

३) त्याअर्थी, मा.पोलीस सहाय्यक आयुक्त पुणे शहर श्री.डॉ.रवींद्र शिसवे तथा विशेष प्राधिकृत कार्यकारी दंडाधिकारी शासनाच्या दि.१/४/१९७४ चे अधिसुचनेव्दारे प्राधिकृत अधिकारी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४४ (१) (३) अन्वये मनाई आदेश परिच्छेद क्र. ५ मधील नमुद सुचनांच्या अधिन राहुन सोमवार दि.२३ मार्च २०२० रोजी सांयकाळ ०५.०१ वाजता ते मंगळवार दि. ३१ मार्च २०२० रोजी रात्री १२.०० वाजण्याच्या दरम्यान लागू करण्यात आले आहे.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा ५ पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे कार्यक्रम, समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव, उरुस, जत्रा, मनोरंजनाचे कार्यक्रम, क्रीडा व इतर सर्व स्पर्धा इ. यांना मनाई राहील.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात खाजगी व सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा पाच पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये जसे कार्यशाळा, कॅम्प, प्रशिक्षण वर्ग, बैठक, मिरवणुक, मेळावे, सभा, आंदोलने, पुणे दर्शनसारख्या सहली, देशांतर्गत व परदेशी सहली इ. यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात असणा-या दुकाने / सेवा आस्थापना, उपहारगृहे/खाद्यगृहे/खानावळ, शॉपींग काँप्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, मनोरंजनाची ठिकाणे, क्लब/पब, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव, उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, शाळा, महाविद्यालये, खाजगी शिकवणी वर्ग, व्यायामशाळा, संग्रहालये, ऑनलाईन लॉटरी सेंटर, व्हिडीओ पार्लर इ. बंद राहतील.
सर्व नागरिकांना अनावश्यकरित्या सार्वजनिक ठिकाणी विहीत करण्याशिवाय येण्यास मनाई राहील.
उपरोक्त नमुद कारणांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कारणास्तव ५ किंवा ५ पेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक/खाजगी ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे.

४) सदरच्या खालील बाबतीत आदेश लागु होणार नाहीत..
शासकीय / निमशासकीय कार्यालये, सरकारी महामंडळाचे उपक्रम/आस्थापना, पोस्ट ऑफीस
रुग्णालये, पॅथोलॉजी लॅबोरेटरी, दवाखाना, आरोग्य विषयक साहित्य निर्मिती केंद्र
सर्व प्रकारचे वैदयकीय महाविदयालय ( अॅलोपथी, आयुर्वेदिक, होमिओपथी इ.), नर्सिग कॉलेज
रेल्वे स्टेशन, विमानतळ, बस स्थानक, ( संबंधीत विभागाच्या धोरणांनुसार), महानगर परिवहन थांबे व स्थानके, रिक्षा थांबे, पेट्रोल-सीएनजी गॅस पंप
अत्यावशक सेवा ( वीज, पाणीपुरवठा, दुरसंचार इ.) , अत्यावशक वस्तु यांची वाहतुक व्यवस्था
बँक, एटीएम, विमा कंपनी कार्यालय
अत्यावश्यक किराणा सामान, दुध / दुग्धोत्पादने, ताजी फळे, भाजीपाला व त्यावरील प्रक्रिया केंद्रे, औषधालये, जीवनावश्यक वस्तु, पिण्याचे पाणी इत्यांदीची विक्री ठिकाणे तसेच त्यांची वाहतुक व्यवस्था
उपहारगृहांनी योग्य ती सर्व खबरदारी घेवुन खाद्यपदार्थ बनविणे, पार्सल स्वरुपात काऊंटर तसेच इतर मार्गांनी विक्री/वितरीत करण्यास परवानगी राहील.
सर्व हॉटेल/लॉज यांना तेथे वास्तव्यास असणा-या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेवुन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवून देण्यास परवानगी राहील.
विदयार्थ्यांसाठी खानावळ, महाविदयालय/ वस्तीगृह यांमधील कॅन्टीन/ मेस ( केवळ परिक्षार्थीसाठी)
राज्य शासन व केंद्र शासनाकडुन घेण्यात येणा-या सर्व स्पर्धा परिक्षा, विद्यापीठ / विश्व विद्यालयाच्या परीक्षा
आस्थापना ( उदा.माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्यांच्याकडे देश व परदेशातील अति महत्वाच्या (Critical -National &
International Infrastructure) उपक्रमांची जबाबदारी आहे व सदर आस्थापना बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येवु शकते असे सर्व संबंधित उपक्रम कार्यान्वित राहु शकतील. ( परंतु यादृष्टीने सदर आस्थापना कार्यरत ठेवण्याच्या आवश्यकतेबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना rdc.pune-mh@gov.in येथे विशेषरित्या कळविणे बंधनकारक आहे.)
प्रसारमाध्यमांचे ( सर्व प्रकारचे दैनिक, नियतकालिके, टीव्ही न्युज चॅनेल इ.) कार्यालय
घरपोच सेवा ( अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट, झोमॅटो, स्विगी इ.)
उत्पादन व निर्मिती केंद्रे ( केवळ जीवनावश्यक वस्तु )
पुर्वनियोजित विवाह समारंभ ( कमाल २५ व्यक्तींपुरता मर्यादित)
अंत्यविधी, ( गर्दी होऊ नये याची पुर्ण दक्षता घ्यावी)
१) वरील नमुद सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी, शिक्षक यांनी त्यांची नेमणुकीचे आदेश, परिक्षेसाठीचे प्रवेशपत्र तसेच ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक राहील.
२) वरील नमुद ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव व प्रसार टाळण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची दक्षता संबंधित कार्यालये, दुकान/आस्थापना यांच्या चालक/ मालक, कार्यालयीन प्रमुख तसेच व्यवस्थापक यांनी घ्यावी.

५) सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

६) उपरोक्त ठिकाणे/कार्यक्रम येथील संबंधित आयोजक तसेच आस्थापना मालक/चालक/व्यवस्थापक यांना प्रत्येकास आदेशापुर्वी स्वतंत्र नोटीस बजावणी शक्य नसल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) अन्वये प्राप्त अधिकारानुसार सदरचा आदेश एकतर्फी काढण्यात आलेला आहे. याबाबतची माहिती प्रसार माध्यमे, पोलीस स्टेशन, सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच परिमंडळीय पोलीस उपआयुक्त कार्यालय यांच्या नोटीस बोर्डवर नागरिकांचे सुविधेसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

सदरचा आदेश मा. पोलीस सहाय्यक आयुक्त पुणे शहर श्री . डॉ . रवींद्र शिसवे यांनी रविवार दि. २२ मार्च २०२० रोजी दिले आहेत.

Post Bottom Ad

#

Pages