🚨 पोलिसांना कुठलीच सुरक्षा नसल्याने त्यांचे कुटुंबीय भयभीत; दररोज पाणावलेल्या डोळ्यांनी पोलिसांना घरून निरोप दिला जातो.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, April 29, 2020

🚨 पोलिसांना कुठलीच सुरक्षा नसल्याने त्यांचे कुटुंबीय भयभीत; दररोज पाणावलेल्या डोळ्यांनी पोलिसांना घरून निरोप दिला जातो..


🚨 पोलिसांना कुठलीच सुरक्षा नसल्याने त्यांचे कुटुंबीय भयभीत; दररोज पाणावलेल्या डोळ्यांनी पोलिसांना घरून निरोप दिला जातो..

कर्तव्य कठोर खात्यात काम करतांना पोलिसांना नेहमीच सर्व आघाड्यांवर काम करावे लागते. कुठलेही संकट म्हंटले की पोलिसाची आठवण येते. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या उक्तीप्रमाणे पोलिस सतत कर्तव्य करत असतात. मात्र त्यांनाही परिवार आहे. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पोलिस सर्वांसाठी रस्त्यावर उभा आहे. मात्र त्यांना कुठलीच सुरक्षा नसल्याने त्यांचे कुटुंबीय भयभीत होत आहेत. पोलिसांना सुरक्षा कीट द्यावी अशी मागणी त्यांच्या परिवारातून होत आहे.

कोरोनाच्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना स्वतः चे घर कुटुंबीय विसरून फ्रन्टलाइन वर लढणारा योद्धा अशी पोलिसांची प्रतिमा बनली आहे. ही भूमिका बजावताना त्यांनाही आपल्या परिवारापासून अलिप्त राहावे लागत आहे. जोपर्यंत शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव कमी प्रमाणात होता तोपर्यंत त्यांचे कुटुंबीय हे निश्चित होते. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. त्यांचे कुटुंबीय अस्वस्थ होत आहेत. पूर्वी ड्युटी संपवून येणाऱ्या आपल्या पप्पाची प्रतीक्षा करत बसणाऱ्या आणि आल्या-आल्या त्यांच्याकडे धावणाऱ्या मुलांना त्यांच्यापासून दूर ठेवावे लागत आहे. ही बाब आता असह्य होऊ लागली असून दररोज पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना घरून निरोप दिला जात आहे.

सर्वच ठिकाणी पोलिसांची आवश्‍यकता..
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्याच्या कामात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. कोरोना रुग्णांची शोध मोहीम राबवतानाही डॉक्‍टर किंवा आरोग्‍य विभागाच्‍या टीमला पोलीस संरक्षण देत आहेत. रुग्णालयालाही पोलिसांचा खडा पहारा आहे. एखाद्या नगरात सर्वे सुरू करतानाही पोलिसांनाच फ्रन्टलाइनवर वावरावे लागत आहे. याशिवाय रस्ते किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांना तेथेही आपली जबाबदारी पार पाडावी लागते. नोकरीचा भाग म्हणून ते आपले कर्तव्य पार पाडत असले तरी त्यांनाही परिवार आहे. त्यांच्या घरातील ते प्रमुख व्यक्ती आहेत. त्यांच्यावरही पारिवारिक जबाबदारी असताना सलग दोन- दोन दिवस त्यांना सारखा बंदोबस्त करावा लागत आहे.

परिवारांना चिंतेने ग्रासले आहे..
त्यामुळे त्यांच्याही परिवारांना चिंतेने ग्रासले आहे. कोणाचा पती, कोणाचा पीता तर कोणाचा भाऊ आणि मुलगा पोलिसी कर्तव्य पार पाडत आहे. त्यांना सर्वांना आपल्या घरातील पोलिसाची चिंता वाटत आहे. बंदोबस्तावर असलेले बहुतांश पोलिस तरुण आहेत. त्यांची मुले अद्याप लहान आहेत. अशा परिवारातील लहान मुलांना केंव्हा येतील ते समजावून सांगणे त्यांच्या परिवाराला कठीण होऊन बसले आहे. बंदोबस्त संपल्यानंतर घरी गेल्यानंतर आपल्या परिवारासोबत दुरावा ठेवावा लागत आहे.

बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सुरक्षा किट पुरवाव्यात..
याबाबत एका पोलीस पत्नीशी संवाद साधला असता त्यांनी नोकरी करणे आवश्यक असले तरी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सुरक्षा किट पुरवाव्यात अशी माफक अपेक्षा व्यक्त केली. मुंबईत तीन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. अनेक ठिकाणी त्यांच्यावर हल्ले होत आहेत. हतबल झालेल्या पोलिसांना सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व यंत्रणेसह व अधिकारांसह बंदोबस्तावर पाठविले पाहिजे. अशी प्रतिक्रिया पोलिसांच्या परिवारातून दिली जात आहे.

Post Bottom Ad

#

Pages