🚨पोलिस अधीक्षकांच्या कल्पनेतून साकारलेल्या पोर्टलमुळे राज्यभरातील पोलिस प्रशासनाचे काम सुसह्य.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Friday, May 15, 2020

🚨पोलिस अधीक्षकांच्या कल्पनेतून साकारलेल्या पोर्टलमुळे राज्यभरातील पोलिस प्रशासनाचे काम सुसह्य..


लॉकडाउनच्या काळात प्रवासाचा परवाना मागण्यासाठी पोलिसांकडे राज्यातून आतापर्यंत तब्बल 20 लाख 84 हजार अर्ज आले आहेत. यापैकी 5 लाख 42 हजार जणांना पोलिसांनी आजपर्यंत प्रवास परवाना दिला आहे. आणीबाणीच्या काळात बनविण्यात आलेल्या पोर्टलचा उपयोग पोलिस प्रशासन आणि राज्यातील जनतेला झाला.

गेल्या 12 एप्रिल ते 12 मे या एका महिन्याच्या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांतून 98 लाख 17 हजार नागरिकांनी या पोर्टलला भेट दिली. रायगडचे पोलिस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या पोर्टलमुळे अडचणीच्या काळात राज्यभरातील पोलिस प्रशासनाचे काम सुसह्य झाले, त्याहीपेक्षा या व्यवस्थेमुळे नागरिकांची मोठी सोय झाली.

पोलिस प्रशासनात काम करताना लोकोपयोगी पडणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना राबविण्यात आघाडीवर असलेले पोलिस अधीक्षक पारसकर यांनी केवळ दोन-तीन दिवसांत सुरुवातीला केवळ रायगड जिल्ह्यापुरते हे पोर्टल बनविले होते. जनता कर्फ्यू 22 मार्चला होता. त्यानंतर 24 मार्चपासून राज्य सरकारने लॉकडाउन जाहीर केले. त्याच दिवशी अधीक्षक पारसकर यांनी रायगड जिल्ह्यासाठी हे पोर्टल सुरू केले. या पार्टलची उपयोगिता, परिणामकारकता व पारदर्शकतेमुळे कोकण विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक निकेत कौशिक प्रभावीत झाले. या पोर्टलची उपयोगिता त्यांनी राज्याचे पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांच्या कानावर घातली. हे पोर्टल पाहताच भारंबे यांनी हे पोर्टल राज्यभर वापरण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार 28 मार्चपासून covid19.mhpolice.in या पोर्टलचा राज्य पातळीवर उपयोग सुरू करण्यात आला.

पोर्टलचा राज्यव्यापी वापर सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांत आवश्‍यकतेप्रमाणे आणि आलेल्या सूचनांप्रमाणे त्यात 250 प्रकारचे बदल करण्यात आले. पोर्टलच्या सुरळीत कामकाजासाठी 10 जणांची टीम बनविण्यात आली आहे. पोर्टलचे काम सुरळीत चालावे, त्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत तसेच अर्जांची संख्या वाढली तर पोर्टलवर लोड येऊन कामकाज विस्कळित होऊ नये, याची जबाबदारी या टीमकडे सोपविण्यात आली आहे.

गेल्या चार दिवसांत राज्यातल्या एका भागातून दुसऱ्या भागात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. परवाना मिळविण्याची प्रक्रिया सुलभ असल्याने परवान्यासाठी अर्ज करण्याऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रोज जवळपास चाळीस ते पन्नास हजार अर्ज येऊ लागले आहेत. अत्यंत आणीबाणीच्या काळात पारसकर यांनी तयार केलेल्या या पोर्टलमुळे पोलिस प्रशासनाचे काम सुसह्य होण्यास मदत झाली आहे.

Post Bottom Ad

#

Pages