👌पुणे मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार सोमवार दि.१ जून पासून सुरू करण्याचे नियोजन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, May 27, 2020

👌पुणे मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार सोमवार दि.१ जून पासून सुरू करण्याचे नियोजन..

पुणे शहरात गेले दीड महिने बंद असलेले श्री.छत्रपती शिवाजी मार्केटयार्डातील मुख्य भाजीपाला बाजार पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाजीपाला बाजारातील अाडते संघटनेचे प्रतिनिधी, कामगार संघटनेचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक मंगळवार दि.२६ मे रोजी पार पडली. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना तसेच बाजार आवाराचे निर्जंतुकीकरण केल्यानंतर भाजीपाला बाजार लवकरच सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार येत्या सोमवार दि.१ जून पासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभागाचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पालकमंत्री अजित पवार यांनी भाजीपाला बाजार सुरू करण्याच्या दिल्या सूचना..
श्री.छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामधील मुख्य भाजीपाला बाजार गेले दीड महिने बंद आहे. पुणे शहरात भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मोशी, मांजरी, उत्तमनगर येथील भाजीपाला बाजार पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला. मुख्य भाजीपाला बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत होती. पालकमंत्री अजित पवार यांनी भाजीपाला बाजार सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर भाजीपाला बाजार पुन्हा सुरू करण्याबाबत मंगळवारी दि.२६ मे रोजी बैठक पार पडली. यावेळी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख, श्री.छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ तसेच, कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

गुरुवार दि.२८ मे रोजी बाजार समिती, अाडते संघटना, कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक..
या बैठकीत भाजीपाला तसेच फळबाजार पुन्हा सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यानुसार लवकरच भाजीपाला बाजार सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. बाजार आवारात होणारी गर्दी तसेच करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत गुरुवारी दि.२८ मे रोजी बाजार समिती, अाडते संघटना, कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक होणार आहे, अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगीतले की,
बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी दिवसाआड पद्धतीने बाजार सुरू ठेवावा तसेच अन्य पर्याय बैठकीत मांडण्यात आले. बाजार सुरू करण्यात आल्यानंतर सामाजिक अंतर पाळणे, जंतुनाशकांचा वापर, मुखपट्टीचा वापर, तापमापक यंत्राद्वारे तपासणी अशा उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. गुरुवारी दि.२८ मे रोजी पुन्हा बैठकचे आयोजन केले जाणार असून या बैठकीत बाजार नेमका कधी सुरू होईल, याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.

श्री.छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगीतले की,
फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा विभाग एक जूनपासून सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. आडते संघटनेकडून बाजाराचे कामकाज सुरू करण्यापूर्वी बाजार समिती प्रशासनाकडे काही सूचना मांडण्यात आल्या आहेत. गुरूवारी दि.२८ मे रोजी आडते संघटनेची बैठक होणार आहे. त्याच दिवशी बाजार समिती, बाजार आवारातील घटकांची बैठक होणार असून या बैठकीत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages