🚨 कामावर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतरही गैरहजर राहिल्याने राज्य राखीव पोलिस दलातील (S.R.P.F) 17 जवानांचे निलंबन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 30, 2020

🚨 कामावर हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतरही गैरहजर राहिल्याने राज्य राखीव पोलिस दलातील (S.R.P.F) 17 जवानांचे निलंबन..

कोरोना महामारी राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आली असून सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरही गैरहजर राहिलेल्या राज्य राखीव पोलिस दलातील (S.R.P.F) 17 जवानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र पोलिस अधिनियम व राज्य राखीव पोलिस अधिनियमांतर्गत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निलंबित केलेले हे सर्व जवान राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक 8 मधील असून, सहायक समादेशक लक्ष्मण आतकरी (58) यांच्या तक्रारीवरून वनराई पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

देशात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असून, त्यातही मुंबईत सर्वांत जास्त फैलाव झाला आहे. कोरोना राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली आहे. नागरिकांना कोरोनापासून वाचवण्यासाठी राज्यतील पोलिस दल, सुरक्षा यंत्रणांतील 55 वर्षांखालील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोरेगाव येथील राज्य राखीव दलाच्या गट क्रमांक 8 मधील 17 जवान रजेवर होते. सर्वांच्या रजा रद्द झाल्यानंतरही ते कर्तव्यावर हजर राहिले नव्हते.  या 17 जवानांना व्हॉट्सॲप संदेश आणि दूरध्वनीवरून कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्यापैकी एकाही जवानाने आदेशाचे पालन केले नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा आदेश देऊन हजर न राहिल्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यालाही या जवानांनी जुमानले नाही. अखेरीस या 17 जवानांवर निलंबनाची कारवाई केल्याचे पत्र देण्यात आले. खात्याअंतर्गत चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देशही देण्यात आले. त्यानंतरही हे जवान हजर झाले नाहीत. अखेर S.R.P.F चे सहायक समादेशक लक्ष्मण आतकरी यांनी वनराई पोलिस ठाण्यात या 17 जवाना विरोधांत गुन्हा दाखल केला. राज्य राखीव पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच एवढ्या जवानांवर एका वेळेला गुन्हा दाखल करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Post Bottom Ad

#

Pages