😷 लॉकडाऊन 4 मध्ये "तूच आहे तुझ्या जीवनाचा रक्षक".. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Thursday, May 14, 2020

😷 लॉकडाऊन 4 मध्ये "तूच आहे तुझ्या जीवनाचा रक्षक"..

तिसर्‍या लॉक डाऊनमध्ये काही प्रमाणात खासगी कंपन्यांचे व्यवहार सुरू झाले. किराणा, मेडिकल, भाजी दुकाने, इतर काही दुकाने सुरूच आहेत, पण लॉक डाऊन 4 मध्ये जेव्हा काही ठिकाणी आणखी सवलती दिल्या जातील तेव्हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होणार आहे तो सुरक्षित अंतराचा, मास्क लावण्याचा. जनता हे बंधन कितपत पाळणार, यावर लॉक डाऊन 4 चे आणि पुढील परिस्थितीचे भवितव्य अवलंबून असेल. ‘शेवटी तूच आहे तुझ्या जीवनाचा रक्षक’ हाच धडा कोरोनाने दिला आहे.
 
24 मार्चला पहिला लॉक डाऊन जाहीर झाला तो 14 एप्रिलपर्यंत, परंतु एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेता परत 15 एप्रिल ते 3 मे असा दुसरा लॉक डाऊन जाहीर केला गेला. कोरोनामुळे गंभीर बनलेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न या काळात केले गेले. अजूनही ते सुरूच आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने परिस्थिती हाताळली जात आहे. जेणेकरुन कोरोनाचा प्रादुर्भाव संपविण्यात यश मिळवता येईल. आता 17 मे नंतर 4 थ्या लॉक डाऊनचे सुतोवाच पंतप्रधानांनी मंगळवारीच केले आहे. त्याचे स्वरूप नमके कसे असेल हे नंतरच कळू शकेल.

अर्थात, एकूणच लॉक डाऊनचा विचार केला तर जनतेने ते किती गंभीरपणे घेतले हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. लॉक डाऊन ही काही फक्त सरकारचीच गरज नाही हे प्रथम लक्षात घ्यायला हवे. देशातील, राज्यातील जनतेला पंतप्रधान, मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री वारंवार विनंती करित आहेत ‘घरात राहा, सुरक्षित राहा’, ‘नियमांचे पालन करा.’ ते  असे का सांगत आहेत? कारण संकट मोठे आहे. त्याचा नक्की अंदाज येत नाही. डाँक्टर्स, वैद्यकीय स्टाफ प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. आपला जीव धोक्यात असल्याची जाणीव त्यांना आहे. बर्‍याच डॉक्टर, परिचारिकांना त्याची लागण झाली. पोलिस अधिकारी, पोलिस स्टाफ रात्रंदिवस रस्त्यावर उतरून बंदोबस्त बजावत आहेत. त्यांच्यावरील ताण वाढला आहे.

आता तिसरा लॉक डाऊन 17 मे रोजी संपेल. ‘आपण कोरोनाची गती कमी केली असली तरी त्याची साखळी खंडीत करू शकलेलो नाही. त्यासाठी कडक निर्बंध पाळावे लागणार आहेत. नियमांचे पालन करावे लागणार आहे,’ असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते खरेच आहे. कारण 4 था लॉक डाऊन कसा असेल याची आपल्याला अजून कल्पना नाही. तिन्ही लॉक डाऊनच्या काळात अनेकांनी गांभीर्य कमी दाखवले. जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली अजूनही लोक उगीच बाहेर फिरतात हे सत्य आहे. लॉक डाऊन, संचारबंदी, गांभीर्याने घेत नाही. पंतप्रधानांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. ‘कोरोना आपल्यापर्यंत पोहोचणार नाही या भ्रमात कोणीही राहू नका’, ‘सुरक्षित सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा.’ कारण सावधानता हटी, दुर्घटना घटी असेच होत असते.

8 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी जनतेला संबोधित केले. मेअखेरपर्यंत कोरोना संपला पाहिजे. राज्य ग्रीनझोनमध्ये यायला हवे. त्यासाठी काय काय करायचं ते करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र ते यशस्वी होण्यासाठी जनतेही तेवढीच साथ सरकारला मिळायला हवी. कारण या आधीच्या लॉक डाऊनच्या काळात काय काय घडले त्यावर नजर टाकली तर गंभीर स्थिती दिसते. डाँक्टर्स, आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी आपला जीव धोक्यात टाकून कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. पुणे, मालेगांव, संभाजीनगर, मुंबईत, तसेच अनेक ठिकाणी अशा घटना घडल्या. त्या अतिशय निंदनीय आहेत.

या काळात गुटखाबंदी असतानाही अनेक ठिकाणी म्हणजे नांदेडला 46 लाख, नवापूर-नंदुरबारला 50 लाख, पुण्यात लाखोंचा गुटखा जप्त करण्यात आला. अनेक ठिकाणी 5 -10 रूपयांच्या पुड्या 60 - 60 रूपयांना विक्री करून काळाबाजार केला गेला. छुप्या मार्गानी देशी-विदेशी दारुची विक्री झाली.

दरम्यान, मधल्या काळात मर्कजप्रकरण उद्भवले. त्यातील काहींचा राज्यात प्रवेश झाल्याने कोरोनात भर पडली. त्यातले काहीजण लपून बसल्याने त्यांना शोधण्यात पोलीस यंत्रणेचा बराच वेळ गेला. राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील कोरोनाचा प्रादुर्भाव, झालेली लागण, मृत्यू याचा विचार करुन शासन-प्रशासनाने रेड, आँरेंज, ग्रीन असे तीन प्रकारचे झोन (विभाग) केले. त्यानुसार तेथील निर्बंध ठरवले. परंतु आता 36 पैकी 34 जिल्ह्यांत लागण झाल्याचे सांगितले जात आहे. याचाच अर्थ जनता अजूनही आवश्यक तेवढी गंभीर नाही. उचलली पिशवी चालले बाजाराला अशी परिस्थिती दिसत आहे.
मध्येच स्थलांतरितांचा प्रश्न निर्माण झाला. त्यांच्यासाठी निवारा केंद्रे उभारले, पण आपापल्या गावी जाण्याची ओढ तीव्र असल्याने त्यांच्यासाठी विशेष रेल्वेची व्यवस्था केली. काहीजण मजल दरमजल करत पायीच निघाले.

लाॅकडाउन काळात कंपन्या बंद होत्या, काही कंपन्यांमध्ये घरून कामकाज सुरू असून अनेक कंपन्यांनी पगारात निम्म्याने कपात केली आहे. हातावर पोट असणार्याची वाईट अवस्था झाल्यानेट अनेक संस्था, सरकारने मदत केली. पण त्यालाही मर्यादा आहेत. तिसर्‍या लॉक डाऊनमध्ये काही प्रमाणात खासगी कंपन्यांचे व्यवहार सुरू झाले. किराणा, मेडिकल, भाजी दुकाने, इतर काही दुकाने सुरूच आहेत, पण लॉक डाऊन 4 मध्ये जेव्हा काही ठिकाणी आणखी सवलती दिल्या जातील तेव्हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होणार आहे तो सुरक्षित अंतराचा, मास्क लावण्याचा. जनता हे बंधन कितपत पाळणार, यावर लॉक डाऊन 4 चे आणि पुढील परिस्थितीचे भवितव्य अवलंबून असेल. आता हे सगळे काही काही प्रमाणात सुरू झाले आहे. पुढे आपल्याला कोरोनाच्या दहशतीतून बाहेर येऊन परिस्थितीला तोंड द्यावेच लागेल. पंतप्रधानांनीही तेच सांगितले. तेव्हा भविष्यात कोरोनाचे सर्व नियम पाळून आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे.

अनेक तज्ञांच्या मते हिंदुस्थान सामुदायिक संसर्गाच्या उंबरठय़ावर आहे. मे महिन्यापेक्षा जूनमध्ये ही प्रकरणे वाढू शकतात. तेव्हा फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन खूप महत्वाचे आहे. अनावश्यक बाहेर निघू नये. कोविड 19 च्या कृती दलाच्या प्रमुखांनी ही सावधनतेचा इशारा दिला आहे.
सरकारने आता हळूहळू काही भागांतील काही गोष्टींचे नियम शिथिल केले आहे. थोडक्यात जनतेवर जबाबदारी टाकली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. प्रत्येकाने स्वत:वर निर्बंध घालणे अत्यावश्यक आहे. ‘कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा रक्षक.’ हे आपल्याला समजून घ्यावे लागणार आहे.

Post Bottom Ad

#

Pages