🚨 पोलिसांना स्वतःच स्वतःचेही रक्षण करावे लागणार.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, May 12, 2020

🚨 पोलिसांना स्वतःच स्वतःचेही रक्षण करावे लागणार..

राज्यातील सातशेहून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील 70 हून अधिक पोलीस कर्मचार्‍यांवरील उपचार यशस्वी झाले असून ते करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय इतर पोलिसांवर उपचार सुरू आहेत. सामान्य नागरिकांपर्यंत कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी डॉक्टर्स दवाखान्यात प्राणपणाने लढा देत आहेत. तर रस्त्यावरची करोनाविरोधातील लढाईत पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे कर्मचारी तसेच सरकारच्या आपत्कालीन विभागातील कर्मचारी आघाडीवर आहेत. स्वयंसेवी संस्थाही कोरोना विरोधातील लढ्यावर काम करत आहेत. रुग्णालयात डॉक्टरांवर आणि पोलिसांवर होणारे हल्ले निषेधार्हच आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस आपला आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाचाही जीव धोक्यात घालून रस्त्यावर लढा देत आहेत. टवाळक्या करत उगाचच किरकोळ कामासाठी रस्त्यावर हिंडणार्‍या नागरिकांना कंटाळून पोलिसांनी त्यांना दांडक्याचा प्रसाद द्यायला सुरुवात केल्यावर कायद्याचा दाखला देऊन टीका करणारेही महाभाग आहेत.

हा पोलीस असतो कोण..तो सुद्धा माणूसच असतो, तुमच्या आमच्यासारखा..त्यालाही घर कुटुंब, मुलंबाळं असतातच. आपली ड्युटी केल्यावर घरी गेल्यावर ज्या ठिकाणी पोलीस राहात असतो, त्या चाळ, इमारतीमध्ये पोलिसाकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. हे आले कोरोना घेऊन…असा काहीसा कुत्सित अविर्भाव त्यात असतो…पण हे पोलीस नसते तर आज आपल्या इमारतीतच नाही, तर घरातही विषाणू शिरला असता याची जाणीव या सूज्ञ नागरिकांना नसते. ‘सद्रक्षणाय खल निग्रहणाय’ असे ब्रीद वाक्य असलेल्या पोलिसांसमोर आव्हान बनलेला हा गुन्हेगार नेहमीपेक्षा वेगळा आणि ताकदीचा आहे. तो दिसतच नसल्याने त्याला अटक किंवा तडीपार करता येत नाही. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापेक्षाही हा गुन्हेगार धोकादायक आहे. मात्र, तरीही महाराष्ट्रातला पोलीस त्याच्यासमोर संपूर्ण ताकदीनिशी आव्हान देऊन उभा ठाकला आहे.

लॉकडाऊनमध्ये काम नसल्यामुळे लोकांचे समूह गावाकडे परतत आहेत. अशा वेळी रस्त्यावर बंदोबस्तात उभ्या असलेल्या पोलीस दादाचाच अशा गोरगरिबांना खरा आधार आहे. अनेक ठिकाणी क्वारंटाईन केलेल्यांना जेवण पाणी, अत्यावश्यक सुविधा देण्यासाठी पोलिसच धावपळ करत आहेत. कोविड 19 चा संशय असलेले आणि क्वारंटाईनमधून पळून गेलेल्यांना हुडकून काढण्याचे आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याचे कामही पोलिसच करत आहेत. अशा लोकांच्या जीवाच्या रक्षणाची जबाबदारीही पोलिसांवरच आहे. वाहने नसल्यामुळे चालत जाणार्‍यांमध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली किंवा अचानक त्याची तब्येत बिघडल्यावर त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये सोडण्याचे कामही पोलिसांनाच करावे लागत आहे.

अशा परिस्थितीत त्या पोलिसावर असलेला मानसिक तणाव आणि दबावाचा विचार करायला हवा. पोलीस आणि डॉक्टर्स यांचे काम आपण वाटून घेऊ शकत नाही, मात्र त्यांचे काम वाढता कामा नये, इतकी काळजी नागरिक नक्कीच घेऊ शकतात. मात्र काही ठिकाणी पोलिसांवरच हल्ले करण्याचे प्रकार होत आहेत. लॉकडाऊनमुळे नागरिक मानसिक तणावाखाली आहेत. हे जरी खरे असले तरी असा तणाव पोलिसांवर काढणे निषेधार्ह आहेच ते माणुसकीचेही अवमूल्यन आहे. कामगारांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यातही पोलीस पुढे आहेत. भिवंडीमध्ये पोलिसांनी हे काम चोख बजावले आहे. मालेगाव, मुंब्रा, भिवंडी तर मुंबईत धारावी, वरळी, बेहरामपाडा अशा संवेदनशील ठिकाणी पोलीस अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत आहेत. कोरोनाचा विषाणू तुमच्या आमच्या घरात शिरकाव करू नये म्हणून आपल्या घराबाहेरच्या रस्त्यावर पोलीस दांडका घेऊन आपला जीव धोक्यात घालून उभा आहे. कोरोना विषाणूला जीव नाही, मात्र त्याचे वागणे हे एखाद्या सजीव पाताळयंत्री खलनायकासारखे आहे. पोलिसांवरच हल्ला केल्यावर त्यानंतर नागरिकांना वाचवायला उरणारच कोण…असा घात लावणारा विचार या विषाणूने केला असावा…. त्यामुळेच सातशेच्यावर पोलिसांना कोविड 19 चा संसर्ग झाला आहे. मुंबईत बॉम्बस्फोट झाले तेव्हा पोलिसच मदतीला होता. दंगली झाल्यावरही रस्त्यावर पोलीसच सुरक्षेसाठी तैनात होता. दहशतवादी हल्ला झाल्यावरही पोलिसांनीच लष्कराच्या मदतीने मुंबई वाचवली. पूर पावसातही पोलिसांनीच इथल्या नागरिकांचे रक्षण केले, आता वेळ इथल्या नागरिकांची आहे.

कोरोना विरोधातील लढ्यात डॉक्टर आणि इतर सहकारी कर्मचार्‍यांना आवश्यक त्या सुविधा ज्यात पीपीई किट्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याने वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचार्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात होती. ठाण्यासह राज्यातील काही महापालिकांमध्ये सफाई कामगारांनीही त्यांना स्वच्छतेच्या कामासाठी आवश्यक साधने उपलब्ध केली जात नसल्याच्या तक्रारी होत्या. पोलीस कर्मचार्‍यांबाबतही अशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी कर्तव्यावर करण्याच्या उपाययोजनांबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. शक्य त्या ठिकाणी मानवी संपर्क टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शक्य त्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने गस्त घालावी. कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करावे. लोकांच्या थेट संपर्कात येण्याचे टाळावे, मास्क आणि सॅनिटायझर वापरण्याविषयी काळजी घ्यावी. पोलीस चौक्या बंद ठेवून ठाण्यांतूनच काम करावे, पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांना विनाकारण गोळा करू नये, याशिवाय संदेश वहनाच्या कामासाठी इमेल, इंटरनेटचा वापर करावा. आदी उपाययोजना पोलिसांसाठी राबवण्याच्या सूचना आहेत. या उपाययोजना पोलीस ठाण्यात राबवणे एक वेळेस शक्य होईल. मात्र माणसांच्या बंदोबस्तातील पोलिसांना मानवी संपर्क टाळणे कठिण आहे. त्यामुळे पोलिसांना स्वतःच स्वतःचेही रक्षण करावे लागणार आहे.

कोविड 19 विषाणू आणि नागरिक यादरम्यान तीन मजबूत भिंती आहेत. पहिली भिंत ही पोलिसांची आहे. दुसरी इथल्या पालिका, सरकारी यंत्रणांची आणि तिसरी निर्णायक भिंत डॉक्टरांची आहे. त्यांनी आता आपल्या रक्षणकर्त्याला वाचवायचे आहे. त्यासाठी पोलिसाच्या कामाचा ताण कमी कसा करता येईल, असं वर्तन इथल्या नागरिकांकडून अपेक्षित आहे.

Post Bottom Ad

#

Pages