🍋 आंबा घेताना नैसर्गिकरित्या पिकवला आहे की कृत्रिमरित्या ते असे ओळखा.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Saturday, May 2, 2020

🍋 आंबा घेताना नैसर्गिकरित्या पिकवला आहे की कृत्रिमरित्या ते असे ओळखा..


🍋 आंबा घेताना नैसर्गिकरित्या पिकवला आहे की कृत्रिमरित्या ते असे ओळखा..

फळांचा राजा आंबा म्हणजे अगदी लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना मनापासून आवडणारे फळ. पिवळाधमक, रसरशीत आणि गोड आंबा खायला मिळणं म्हणजे अगदी ब्रम्हानंदी टाळी लागण्यासारखं आहे. आंब्याचा सिझन जेमतेम दोन महिन्यांचा, त्यात आंबा मनसोक्त खायचा म्हटल्यावर आंब्यावर आडवा हात मारावाच लागणार.

आंबा हे फळ एक असले तरी त्यापासून बनणारे पदार्थ हे अनेक असतात आणि सोबतच चविष्ट देखील असतात. शिरा, आंबा पोळी, आंबा मोदक, आईस्क्रीम अशा एक ना अनेक पदार्थांचा या दोन महिन्यात आपल्याला फडशा पाडावा लागतो. पण हा आंबा खाताना तो आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे कि नाही हे बघणं देखील महत्वाचं असतं. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला आंबा खायचा म्हटल्यावर त्याचा कोणत्याही प्रकारे अपाय आपल्याला होता कामा नये. आंबा नैसर्गिकरित्या पिकवला असेल तर फिकर नॉट पण जर आंबा कृत्रिमरीत्या पिकवला असेल तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला नक्कीच भोगावे लागतात.

आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ करणे अगदी साहजिक झाले आहे मग त्यातून आपला हा राजा तरी कसा सुटणार बरं ? आजकाल फळांना लवकर पिकवण्यासाठी आणि त्यांना रसरशीत बनविण्यासाठी सर्रासपणे कार्बाईडचा वापर केला जातो आणि हे कार्बाईड आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकते. त्यामुळे आज या लेखातून तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा अगदी सहज ओळखू शकता.

▪️ आंबा विकत घेण्यापूर्वी हातात घेऊन नीट निरीक्षण करा. नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा हातात घेतल्यावर तो अतिशय नरम असल्याचे तुम्हाला जाणवेल. आंबा पूर्णपणे नरम असणे ही नैसर्गिकरित्या आंबा पिकवल्याची पहिली पायरी.

▪️ नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावर सुरकुत्या असतात तर कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा थोडा कडक, चमकदार आणि गुळगुळीत असतो.

▪️ बऱ्याच वेळा नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावर साधारण ब्राऊन रंगाचे डाग आपल्याला दिसून येतात. पण कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा पिवळ्याधमक रंगाचा असतो आणि सर्व बाजूनी त्याचा रंग समान असतो.

▪️ आंबा घेताना कायम त्याच्या देठाकडील भागाचा वास घेऊन बघा. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा देठाकडून नेहमी गोड सुवास येतो.

▪️ आंबा मुळातच गोड असल्याने कार्बाईड लावलेला आंबा हाताला अतिशय मऊ लागतो तसेच तो लवकर आंबल्याने त्याच्यातून दाट दर्प येतो ,तेव्हा असा आंबा घेण्याचे कायम टाळावे.

▪️ नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याचा रंग नेहमी पिवळा, हिरवा, गुलाबी किंवा लालसर असतो. आंबा कोणत्या जातीचा आहे यावर त्याचा रंग अवलंबून असतो. पण जर आंबा पिवळाधमक असेल तर निश्चितपणे तो आंबा कृत्रिमरीत्या पिकवलेला आहे.

कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबा खाल्ल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम..
▪️ आंबा कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. त्यामुळे अश्या आंब्यांमध्ये काही प्रमाणात फॉस्फरस असण्याची शक्यता असते. परिणामी तुमचे डोके जड होणे हा त्यामुळे होणार दुष्परिणाम आहे.

▪️ कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचे अति प्रमाणात सेवन केल्यास त्यातील रसायनांमुळे तुमच्या शरीरातील अवयवांमध्ये बिघाड होऊ शकतो. जसे कि यकृत, मूत्रपिंड यांचे कार्य मंदावणे.

▪️ मळमळ, चक्कर येणे, उलटी हे देखील कृत्रिमरीत्या पिकवलेल्या आंब्याचे सेवन केल्यामुळे होणारे परिणाम आहेत.

▪️ कृत्रिमरीत्या आंबा पिकवण्यासाठी ज्या रसायनांचा वापर केला जातो त्यामुळे तुम्हाला कर्करोग देखील होण्याची शक्यता असते.

▪️ गर्भवती स्त्रियांनी कृत्रिमरीत्या पिकवलेला आंबे खाल्ले तर गर्भाशयातील बाळावर देखील त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.

Post Bottom Ad

#

Pages