📣पुणे जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Wednesday, June 10, 2020

📣पुणे जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन..

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील लॉकडाऊनमुळे मोठ्याप्रमाणावर परप्रांतीय कामगारांचे पुणे जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तसेच इतर राज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे आता अनलॉक १.० अंतर्गत काही अटी व शर्तीच्या आधारे सुरु झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रास्ता पेठ, पुणे या कार्यालयाच्या वतीने नोकरीकरीता इच्छुक बेरोजगार युवक युवतींसाठी "ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी एका परिपत्रकान्वये दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील नामांकित आस्थापना / कंपन्यांमधील विविध प्रकारच्या रिक्तपदाद्वारे मोठी सुवर्णसंधी देऊ केली आहे. या ऑनलाईन रोजगार मेळाव्यांतर्गत पुणे जिल्ह्यातील नामवंत विविध उद्योजकांकडील सर्वसाधारणपणे मशीन ऑपरेटर, वेल्डर, फिटर, पेंटर, शीटमेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, ऑटो मेकॅनिक, मेसन, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, कारपेंटर, ग्राइंडर, टर्नर, मशिनिस्ट, इंजिनिअरिंग डिप्लोमा, प्रोग्रॅमर, बीडीई, पायथॉन डेव्हलपर, सॉफ्टवेअर / हार्डवेअर इंजिनिअर, अकाउंटंट, टीग वेल्डर या सारख्या पदासाठी आवश्यक ती पात्रताधारक तसेच इयत्ता ७ वी ते ९ वी, दहावी, बारावी, पदवीधर उमेदवारांसाठी एकूण २६०० पेक्षा अधिक रिक्तपदे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

हा मेळावा केवळ ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणा-या उमेदवारांसाठीच घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाद्वारे लॉगीन करुन आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार उचित असलेल्या रिक्त पदासाठी आपला पसंतीक्रम व उत्सुकता ऑनलाईन पध्दतीने नोंदवावे. पसंतीक्रम नोंदविताना शक्यतो आपण वास्तव्यास असलेल्या ठिकाणाच्या आसपासच्या कंपन्यांची तसेच आवश्यक पात्रता धारण करीत असल्याची खात्री करुन पदाची निवड करण्याची दक्षता घ्यावी, जेणेकरुन कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे शासनाने विहीत केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे व संधीचा लाभ घेणे उद्योजक व उमेदवार या उभयतांना सहज शक्य होईल.

इच्छुक व ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार व उद्योजकांच्या सोयीनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक व वेळ एसएमएस अलर्ट द्वारे कळविण्यात येईल व शक्य असेल तिथे ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल. तरी इच्छुक युवक युवतींनी २२ जून २०२० पर्यंत आपापले पसंतीक्रम नोंदवून या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन सहाय्यक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.

Post Bottom Ad

#

Pages