🐗भोर तालुक्यात शिकार्यांनी रानडुक्कराची केली शिकार ; गुन्हा दाखल.. - पोलिस कर्तव्य टाईम्स

Breaking

Home Top Ad

#

Post Top Ad

#

Tuesday, June 9, 2020

🐗भोर तालुक्यात शिकार्यांनी रानडुक्कराची केली शिकार ; गुन्हा दाखल..

भोर तालुक्याच्या वीसगाव खो-यातील हातनोशी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रामोशीवाडीच्या दरीमध्ये अज्ञात शिका-यांनी रानडुक्कराची शिकार केल्याचे निदर्शनास आले आहे. रविवार पहाटे ही घटना घडली असून वन विभागाच्या कर्मचा-यांनी शिकार करण्यात आलेले रानडुक्कर आणि हत्यार ताब्यात घेतले आहे. मात्र शिकार करणारे ८- १० जण पळून जाण्यात यशस्वी झाले.

वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे रामोशीवाडी जवळच्या डोंगरात काही लोक शिकारीसाठी आले असल्याची खबर वन विभागाला मिळाली. त्यांच्यासोबत शिकारीची हत्यारे आणि शिकारी कुत्रे असल्याचेही समजले. त्यानंतर वन विभागाचे उपविभागीय वन अधिकारी आशा भोंग यांच्या मार्गदर्शनाखाली भोरचे वनपरिक्षेत्रअधिकारी दत्तात्रेय मिसाळ व वनपाल शिवकुमार होनराव यांनी २५ कर्मचा-यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. वन कर्मचा-यांनी सकाळी साडेआठच्या सुमारास रामोशीवाडीच्या डोंगराला चारही बाजूंनी वेढा घातला.

कर्मचा-यांनी पाले, कर्नावड, रावडी, वरोडी आणि हातनोशी या गावांच्या डोंगरांकडून शोध मोहिम सुरु केली. दरम्यान शिका-यांना वनकर्मचारी आल्याचा सुगावा लागल्याने ते डोंगरांच्या कड्याकपारीतून पळून जाण्यास यशस्वी झाले. वन कर्मचा-यांनी रामोशीवाडीच्या दरीतून शिकार केलेले एक रानडुक्कर आणि एक भाला जप्त केला. वन विभागाने अज्ञात शिका-यांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा आणि भारतीय वन अधिनियम या कायद्यखाली गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान शिकार केलेले रानडुक्कर हे शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल आल्यानंतर रानडुक्कर किती वजनाचे व किती वर्षांचे आहे. आणि त्याचा मृत्यु कशा प्रकारे झाला याची अधिक माहिती मिळू शकेल. असे वन विभागाकडून सांगण्यात आले. आरोपींकडून आणखी काही वन्यप्राण्यांची शिकार झाली की नाही? याचा तपासही सुरु आहे. आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांना पकडले जाईल असा विश्वासही वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

#

Pages